Wednesday, November 25, 2020

तोरणागड (प्रचंडगड) भ्रमंती

 *23Nov2020*

*तोरणागड (प्रचंडगड) भ्रमंती*

लॉकडाऊनमुळे पुढे ढकललेल्या गोष्टींच्या यादीमध्ये 'तोरणागड' भ्रमंती सुद्धा राहिलं होतं ते आज योग जुळून आल्याने पूर्ण झालं. सकाळी ७ ला पल्लवी(माझी पत्नी), सिद्धार्थ, पार्थ (माझी मुलं), अक्षय (पार्थचा मित्र) आणि त्याची आई असे सहाजण झायलो मधून गडाकडे निघालो. 'पाबे' घाटामध्ये रस्ता दुरुस्तीचं काम चालू असल्याची माहिती मिळाल्याने रा.म. 4 मार्गे नसरापूर, विंझर, दापोडे, करत वेल्हे गावात गडाच्या पायथ्याशी ९ ला पोचलो. गाडी अजून थोडी वर चढू शकते हे समजल्यावर जिथे रस्ता संपतो तिथपर्यंत नेली.

समोर पाहिलं तर तो रांगडा, एका नजरेत न मावणारा प्रचंडगड पाहून क्षणभर अवाक झालो आणि मनोमन नमस्कार केला. मुलांनी तर पळायलाच सुरवात केली.

थोडं अंतर चढल्यावर एका औदुंबराच्या झाडाजवळ थोडा वेळ बसून पुन्हा पदभ्रमण चालू केलं.



गडावरून काहीजण उतरताना दिसले त्यातल्या एका जोडप्याला 'गडावर जायला कधी सुरुवात केली?' असं विचारल्यावर ते म्हणाले "अर्ध्या तासापूर्वीच. वरती जाऊ नका फार अवघड आहे गड. पुढे जवळपास ९० अंशातले कडे आहेत. त्यातल्या त्यात महिलांना तर फारच कठीण आहे" असं म्हटल्यावर दोघींचा थोडा वेळ मूड बदलला.








पण थोडं थांबत का होईना गड चढायचाच ह्या त्यांच्या निर्धाराने मलाही बरं वाटलं. गड चढताना त्याच्यातील प्रचंडता जाणवते. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच कडे. दुसऱ्या एका बाजूला अतिशय सुंदर दिसणारं गुंजवणे धरण. तोरणा निसर्गाच्या कुशीत अगदी राजबिंडा दिसतो.






काही अंतर चालून गेल्यावर थोडं थांबत, थोडं बसत छोटे छोटे टप्पे पार करत रेलिंगजवळ पोचलो. मग रेलिंगचा आधार असल्याने सर्वांचा आत्मविश्वास वाढला. पुढं वानरसेना दिसली, ती निरुपद्रवी असल्याने मजा आली. थोडं अंतर गेल्यावर गडाचं प्रवेशद्वार 'बिनी' दरवाजाजवळ पोचलो.

ताक विकणारी एक मावशी आमची जणू वाटच पाहत होती. थंडगार ताक पिताना तिने गडावरची माहिती दिली.

तिच्या माहितीप्रमाणे बुधला माची करणं अवघडही होतं आणि भरपूर वेळही गेला असता त्यामुळे तो प्लॅन आम्ही रद्द केला. आम्ही मग मेंगाई देवीचं दर्शन घेऊन तिथून जवळच असलेल्या महादेवाच्या एका मंदिरात दर्शन घेऊन तिथे जवळच जेवण केलं. घरून मुद्दामच पिठलं-भाकरी, तेल-तिखट, बटाट्याची भाजी, लसणाची चटणी आणि दिवाळीचा थोडा फराळ आणला होता. गडावर कुठेही पिण्यासाठी पाणी नव्हतं पण मावशींनी आम्हाला ते दिलं, खूप उपकृत झाल्यासारखं वाटलं. मग मावशींनाही आमच्यासोबतच जेवण करायचा आग्रह केला. सर्वांनी मिळून यथेच्छ ताव मारल्यावर मग थोडा वेळ आराम करून झुंजार माचीच्या दिशेने कूच केलं.










जवळच असलेला उंच झेंडा दिसला जो आम्हाला गडाच्या पायथ्यापासूनच हात हलवून "वर या" असं आनंदाने सांगत होता. त्याच्याजवळ जाऊन फोटोसेशन झालं. मग जवळ असलेल्या लोखंडी शिडीने खाली उतरून झुंजार माचीकडे निघालो. पुढे एक छोटं भुयार लागलं तिथून फक्त मान खाली करूनच नाही तर अगदी बसत बसतच बाहेर यावं लागलं. मनात विचार आला "राजांनी भल्या-भल्यांच्या माना तुकवल्या आणि ह्या गडाची प्रचंडता पाहून आपलीही मान आनंदाने, आदराने, भक्तिभावाने झुकली जाते." पुढे रॉक-क्लाइंबिंग चा अनुभव देणारे दोन छोटे कडे उतरून अखेर झुंजार माचीजवळ पोचलो. तिथला फडकणारा झेंडा पाहून अंगावर शहारा आला नाही तरच नवल..!









गडावर सोमवारी गेल्याने अजिबातच गर्दी नव्हती. भरदिवसा रातकिड्यांनाही किर्र-किर्र करायला लावणारी निरव शांतता होती. समोर फडकणारा झेंडा आणि बाजूने दरीतून येणारा घों-घों वारा. निसर्गाच्या ह्या आविष्काराला आणि राजांना मनोमन नमस्कार करून आम्ही सर्वजण परतीच्या मार्गाला लागलो. गडावरून पायथ्याला ६ ला पोचलो. तिथून घरी यायला ८ वाजले. गड फिरून आल्यावर सर्वजण इतके आनंदित होतो की आपले पाय दुखतायत हे कळायला दुसरा दिवस उजडावा लागला.

ह्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
दुर्ग-भ्रमंती हा विषय शाळेतील अभ्यासक्रमात असावा. काही कारणाने ते शक्य नसेल तर शाळांनी हा विषय ह्यातील तज्ञ लोकांकडे आऊटसोर्स करावा. मुलांना घडवण्यात दुर्गभ्रमंतीचा एक महत्वाचा वाटा नक्की असू शकतो. असा एक पक्का समज झालाय.