Saturday, August 22, 2015

Baapu

|| बापू ||
एका गावात एक बाई राहत होती. किराणा-मालाचे दुकान चालवून ती गुजराण करायची. तिला एक मुलगा होता, 'बापू'. तिचे आणि तिच्या नवर्याचे फारसे पटत नसल्यामुळे ते वेगळे राहत होते. तल्लख बुद्धीमुळे बापू इतर मुलांपेक्षा वेगळा वाटायचा. वर्षांचा बापू एक दिवस बापाला शोधायला म्हणून रेल्वेमध्ये बसला ते त्याने थेठ पुणेच गाठले. इकडे त्याची आई खूप घाबरली. गावातले एकमेव मास्तर, जाधव गुरुजींनी बापूला यशस्वीरीत्या शोधून दिले. "परत असा सांगता गेलास tar तंगडे तोडीन..!", आईने बापूला दरडावले.
हायस्कूलचे शिक्षण घ्यायला बापूला बरीच मेहनत करावी लागे. गावाबाहेरचे एकापाठोपाठ एक दिसणारे तीन डोंगर जणू काही त्याचे स्वागत करायलाच उभे होते. तीनही डोंगर पार करून कराडला पायी जायचे. परिस्थितीमुळे बापूला त्याची सवय झालेली.
शाळेला सुट्टी लागली की वरवनला चुलत मामाकडे तेलाच्या घाण्यावर काम करायचा. एवढ्याश्या वयात त्याला आलेली समज आणि एकूणच अभ्यासातालीही विशेष चमक पाहून त्याच्या आईला त्याचा प्रचंड अभिमान वाटे.
सातार्यात मेट्रिक पूर्ण केल्यावर बापूने आय टी आय केला. जिल्ह्यात तिसरा आला. आईला आभाळ ठेंगणे झाले. नोकरी शोधात बापूने पुणे गाठले.
"वजन कमी भरतंय तुझे, ह्यावेळी तुझी भरती होणे कठीण आहे", कंपनीच्या जोशी साहेबांनी बापूला सुनावले. "साहेब, प्लीज त्याला एक संधी द्या, तो खूप हुशार आहे.", मोहनने त्याच्या प्रिय मित्रासाठी कळकळीची विनंती केली. "मोहन, मलाही कंपनीची काही बंधने आहेत, नियम आहेत. पण ठीक आहे, एक महिन्यानंतर जर का ह्याचे वजन योग्य भरले नाही, तर मी काही करू शकत नाही". जोशीसाहेब कंपनीमधून बाहेर पडता-पडता बोलले. "ती जबाबदारी माझी साहेब", मोहन
एकाही क्षणाचा विलंब करता उत्तरला. बापू आणि मोहन जिवलग मित्र झाले नसते तरच नवल..!!
"बापूला नोकरी लागलीये, आता त्याचे लग्न करावे म्हणतीये", आई तिच्या भावाजवळ बोलली. "शेजारच्याच गावातले एक चांगले स्थळ आहे..!", मामाने त्याची पिशवी खांद्याला लावत म्हटले. "आत्ता जातो, आणि काय ते ठरवूनच येतो".
बापूला त्याच्या होणार्या पत्नीचा चेहरा दिसला तो थेट लग्नातच. लग्न झाल्यावर दोघेही पुण्याला आले.
काही वर्ष लोटली. कमिन्स कंपनीमुळे बापू त्याची आर्थिक गणिते सहज सोडवू शकला. पुढे त्याला तीन अपत्ये झाली. तिघांची शिक्षणे त्याने व्यवस्थित पूर्ण केली. पुढे प्रत्येकाचे लग्नही थाटामाटात लावून दिले.
काही वर्षांनी बापू 'आजोबा' झाला. बापू आता रिटायर झालाय. त्याची मुलेही व्यवस्थित मार्गी लागल्यामुळे
त्याला आता कसलीही चिंता नाही. सकाळी आणि संध्याकाळी - कि.मी. चालत जाणे, मित्रांना भेटणे, संध्याकाळी नातवंडांबरोबर खेळायचे, घरच्या कामात बायकोला भरपूर मदत करायची, अशी त्याची दिनचर्या चालू आहे. तो खूप धार्मिक वगैरे नाही. खोटे व्यवहार करणे, स्वार्थासाठी एखाद्याच्या पुढे-पुढे करणे ह्याबद्दल त्याला प्रचंड तिटकारा आहे.
वयोमानामुळे तो बराचसा मृदू वाटत असला तरीही त्याचे विचार, मते अजूनही पूर्वी इतकीच परखड, स्पष्ट आहेत.

No comments:

Post a Comment